धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ लागू – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसेच ते कायद्याच्या कसोटीवर टिकावे याबाबतचे काम ‘टीस’ या सामाजिक संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेने आपला अहवाल सादर केला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या निकषावर महाधिवक्ता यांचे अभिमत घेऊन आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या एस.टी.च्या योजनांचा लाभ लागू असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. धनगर समाजाच्या विकासासाठी 22 योजना राबविण्यासाठी 100 कोटी रूपये एवढा निधी घोषित करण्यात आला असून 85 कोटी 3 हजार रुपयांची इतर तरतूद करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यासंबंधी 5500 इतक्या विद्यार्थी संख्येस या शैक्षणिक वर्षात मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या बांधवांना 10 हजार घरे बांधून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली. यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री सदाशिव खोत, प्रविण दरेकर, महादेव जानकर, गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता.