आपत्तीग्रस्त कुटुंबांना आमदार विलास तरे यांच्याकडून अन्नधान्य किटचे वितरण
नालासोपारा / सफाळे / बोईसर. (प्रतिनिधी) – गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई, नालासोपारा, सफाळे, मनोर, बोईसर तसेच परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. परिणामी अनेक कुटुंबांचे अन्नधान्य व घरगुती जीवनावश्यक वस्तींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक गरजू कुटुंबांसमोर दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी आपल्या ढेकाळे येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयामार्फत आपत्तीग्रस्त व गरजू नागरिकांसाठी अन्नधान्य किटचे वितरण सुरू केले आहे. वसई, नालासोपारा, सफाळे, मनोर, बोईसर आदी भागांतील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत ही मदत टप्प्याटप्प्याने पोहोचविण्यात येत आहे. या मदत कार्यामध्ये शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत असून वसई विरार मनपा हद्दीत अभिषेक सिंह ठाकूर, निलेश मौर्या, इमरान सिद्दीकी तसेच अन्य कार्यकर्ते, सफाळे परिसरात उज्ज्वल पाटील व साहिल पाटील, मनोर परिसरात चेतन साळुंखे तसेच बोईसर परिसरातील शिवसैनिकांच्या माध्यमातून अन्नधान्य किटचे वितरण करण्यात येत आहे. विशेषतः विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, अनाथ तसेच इतर गरजू कुटुंबांना प्राधान्याने मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून आपत्तीग्रस्तांना तातडीने दिलासा मिळत आहे. संकटकाळात प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार विलास तरे यांच्या कार्याबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून लोकांमध्ये आमदार विलास तरे हे ” रील मध्ये येणारे नेते नसून रियल “ मध्ये मदतीला येणारे नेते असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.



