मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण – आमदार विलास तरे
# पालघर जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार – जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण
बोईसर. (प्रतिनिधी) – “शिवसेना आम्हाला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण शिकवते. या तत्त्वज्ञानाला अनुसरून जनतेच्या संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणे हीच खरी शिवसेनेची संस्कृती आहे,” असे सांगत बोईसर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी आपला एक महिन्याचा वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडील काळात राज्यभरात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असताना शासन व समाजाने एकत्र येऊन मदतीचे तोरण उभारणे आवश्यक आहे, अशी भावना व्यक्त करत आमदार तरे यांनी जनतेलाही या मदत कार्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
आमदार तरे म्हणाले की, “शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या दुःखात सहभागी आहोत. संकटात माणसांच्या डोळ्यातील अश्रू पुसले नाहीत, तर राजकारणाला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यंदा गोरेगाव, मुंबई येथील नेस्को सेंटर येथे होणार आहे. हा मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम नसून, शिवसेनेच्या विचारांचे, संस्कारांचे आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या लढ्यांचे प्रतीक आहे. दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना जनतेसाठी अधिक कार्य करण्याचा संदेश दिला जाईल, तसेच, “दसरा मेळावा म्हणजे केवळ सभा नव्हे, तर तो शिवसैनिकांच्या रक्तात उकळणाऱ्या ज्वालांचा आविष्कार आहे. याच व्यासपीठावरून प्रत्येक शिवसैनिकाला पुन्हा जनतेसाठी लढण्याची प्रेरणा मिळेल.” असे तरे म्हणाले.
आमदार विलास तरे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांनाही सामाजिक कार्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले. “आपल्या छोट्या-छोट्या मदतीमुळेही एखाद्या कुटुंबाचा संसार उभा राहू शकतो. हेच शिवसेनेचे खरे धोरण आहे. समाजाच्या दुःखात सहभागी होणे आणि मदतीचे तोरण उभारणे,” असे ते म्हणाले.
स्थानिक पातळीवर आमदार तरे यांच्या या निर्णयाचे कौतुक होत असून, जनतेमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.
आ. तरे म्हणाले, “शिवसेना केवळ पक्ष नाही, ती जनतेच्या रक्तात मिसळलेली संस्कृती आहे. आज शेतकरी संकटात आहे, उद्या कामगार अडचणीत येईल, परवा सर्वसामान्य जनता संकट झेलेल, पण शिवसेना नेहमीच या संकटग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. ” असे आ. तरे म्हणाले.
# पालघर जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार – जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण
शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी गोरेगाव, मुंबई येथील नेस्को सेंटरमध्ये होत असून या मेळाव्यासाठी पालघर जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. “दसरा मेळावा हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून तो शिवसैनिकांच्या रक्तात सळसळणाऱ्या परंपरेचा आणि लढाऊ वृत्तीचा उत्सव आहे. पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा सहभाग होईल,” असे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “शिवसेनेचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना महाराष्ट्रात समाजकारण आणि विकासकारणाचा नवा अध्याय लिहित आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेसाठी निर्णय घेणारे नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी दसरा मेळाव्यात पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून शिवसैनिक हजेरी लावतील.” बोईसर, डहाणू, तलासरी, वसई-विरार, विक्रमगड, मोखाडा, जव्हार आदी तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात बसगाड्या, खासगी वाहने आणि संघटित गट मेळाव्याकडे रवाना होणार आहेत. तरुणाई व महिला आघाड्यांचा उत्साह विशेष असून, विविध बॅनर, झेंडे आणि घोषणांनी मेळाव्याचे वातावरण रंगणार आहे. वसंत चव्हाण म्हणाले, “शिवसेना म्हणजे सेवा, संघर्ष आणि समाजकारण. दसरा मेळावा हा आमच्या विचारांचा शंखनाद आहे. पालघर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला बळकटी देईल. जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक या मेळाव्यात उपस्थित राहतील.



