चित्रकार निलेश भागवत यांना दिल्ली सरकारचा पुरस्कार ; उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला गौरव
नवी दिल्ली / मुंबई. (प्रतिनिधी) – ऑनलाईन आंबेडकर डिजिटल कला महोत्सव पोस्टर प्रकारातील प्रसिद्ध चित्रकार निलेश भागवत दिल्ली सरकारच्या हिंदी कला अकादमीचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मनीष सिसोदिया, सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते नुकताच दिल्ली सचिवालयातील मुख्य सभागृहात तो प्रदान करण्यात आला.
दिल्ली सरकारच्या हिंदी कला अकादमीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने देशभरातील डिजिटल चित्रकार, गीतकार आदींसाठी ऑनलाईन आंबेडकर डिजिटल कला महोत्सव 2021 चे आयोजन केले होते. यात निलेश भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधाना वर आधारित ‘ निळ्या आकाशाखाली आम्ही सर्व समान आहोत’ ही संकल्पना मांडून त्यासाठीचे चित्र काढले होते. यात त्यांनी भारतीय महिलांना मिळालेल्या समान अधिकाराचे आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा धागा या चित्रातून अधोरेखित केला होता. त्या चित्राला दिल्ली सरकारच्या हिंदी कला अकादमीचा विशेष पुरस्कार निलेश भागवत यांना प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सामाजिक न्याय व महिला बालविकास मंत्री राजेंद्र पाल गौतम, हिंदी अकादमीचे सचिव डॉ. जितराम भट्ट, कला व सांस्कृतिक विभागाच्या सचिव स्वाती वर्मा आदी उपस्थित होते. दिल्ली हिंदी कला अकादमीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने 14 एप्रिल ते मे 20 या कालावधीत ऑनलाईन आंबेडकर डिजिटल कला महोत्सव 2021 हा आयोजित करण्यात आला होता. त्यात निलेश भागवत यांना हा पुरस्कार मिळाला आहे.