अर्थसंकल्पीय अधिवेशन : आम्हाला चर्चा करण्यात रस, शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारला जाब विचारू – वि. प. ने. देवेंद्र फडणवीस
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्हाला चर्चा करण्यात रस असून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारला जाब विचारू असे राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची एक बैठक मुंबई येथे झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणार असून आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार आहोत. शेतकरी हवालदिल आहे, पण त्याची वीज कापली जाते आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही. अशी खोचक टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकार कडून शेतकऱ्यांना कोणती मदत नाही. ऊस गाळपासाठी जाणार नाही, अशी स्थिती आहे. कर्जमाफीतील अपूर्ण बाबी द्यायला लावणार आहोत. विविध समाजांचे प्रश्न आहेत. छत्रपतींना उपोषणाला बसायला बाध्य व्हावे लागले. आणि पुन्हा तीच आश्वासने सरकारने दिली. भ्रष्टाचार चरमसीमेला पोहोचला आहे. लिपिक साहेबांना लाच मागतो अन् कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात आहे. याचा जाब सरकारला जोरदार विचारू. देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी… ठेवावी असे फडणवीस म्हणाले. तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. तुम्ही म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की, हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे. असे शेवटी फडणवीस यांनी अधोरेखित केले.
यावेळी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनायक मेटे, माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.