गॅस सिलेंडर कंपनीकडून भरपाई देण्यास टाळाटाळ
# स्वातंत्र्य दिनी नुकसानग्रस्तांचा आत्मदहनाचा इशारा ; जिल्हा प्रशासनाकडून अभय ?
यवतमाळ. (प्रतिनिधी) – पिंपळगाव येथील रोहिलेबाबा झोपडपट्टी परिसरात काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला होता. यामध्ये संध्या पराते या महिलेसह इतर नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना तिला नुकसान भरपाई तसेच विम्याचा लाभ देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गॅस कंपनीला केल्या आहे परंतु, त्यांच्या चालढकल धोरणामुळे आजही त्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा वंचितांना दिला आहे. गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात त्यांचा लढा आजही सुरु आहे. शहरातील गॅस कंपनीकडून नुकसान भरपाईसह विम्याचा लाभ देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.पिंपळगाव येथील बॉम्बे गॅस कंपनी तसेच शारदा नगरातील रजनी गॅस कंपनीकडून हा प्रकार होत असल्याने नुकसानग्रस्त आजही लाभापासून वंचित आहे. 30 जून रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या दोन्ही गॅस कंपनींना नोटीस बजावली त्यानंतर 5 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठकही झाली परंतु,पीडितांना नुकसानभरपाई मिळाली नाही.या नुकसानग्रस्तांसाठी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम संबधित गॅस कंपनीकडे नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा करीत आहे.परंतु जिल्हा प्रशासनाकडून त्यांना अभय मिळत असल्याने ते भरपाई देण्यापासून वाचत आहे. येत्या 2 दिवसात त्यांना नुकसानभरपाई तसेच विम्याचा लाभ मिळाला नाही तर नुकसानग्रस्त कुटुंबियांना सोबत घेऊन गेडाम हे आत्मदहन करणार आहे. यात जीवितास धोका झाला तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे गेडाम यांनी कळविले आहे.