आदिवासी महिला कर्मचारीस मारहाण करणाऱ्या आरोपी नगरसेवकास तात्काळ अटक करून नगरसेवक पद रद्द करा – बिरसा क्रांती दल आक्रमक
मुंबई / नंदुरबार. (प्रतिनिधी) – शासकीय कर्तव्य बजावत असतांना आदिवासी महिला कर्मचारीस जातीवाचक शिविगाळ करून अमानुष मारहाण करणाऱ्या नंदुरबार येथील गौरव चौधरी ह्या दोषी नगरसेवकाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करणे, रेती वाहतूक परवाना व नगरसेवक पद कायमस्वरूपी रद्द करावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्र युवा आघाडी राज्याध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधिक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांच्या कडेएका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी पावरा म्हणाले की, दि. 05 जून 2021 रोजी आदिवासी समाजाची महिला तलाठी सौ. निशा पावरा ह्या आपले शासकीय कर्तव्य बजावत असतांना नंदुरबार येथील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिविगाळ करून अमानुष मारहाण केली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून माणूसकीला काळीमा फासणारी आहे. सदर घटनेचा आम्ही आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध करतो. अवैध गौण खनिज नियंत्रण पथकातील आदिवासी महिला शासकीय कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असतांना सौ. निशा पावरा यांना नंदुरबार येथील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली आहे. केस ओढून फरफटत ढकलून दिले आहे, आदिवासी बाई तुला मी सोडणार नाही. नंदुरबार मध्ये नोकरी कशी काय करते ? ते बघतो, तहसीलदार मी खिशात घेऊन फिरतो, तुला पाहून घेईन हरामखोर, तुझा पाटा पाडीन, तू स्वतः ला कलेक्टर समजते का ? मी नगरसेवक आहे तुला बघून घेईन. अशी धमकी दिली आहे. सदर घटना ही स्त्रीच्या अब्रुवर घाला घालणारी असून आदिवासी महिला कर्मचारीवर अन्यायकारक करणारी आहे. सदर आरोपी नगरसेवकावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्तव्य बजावत असतांना महिला कर्मचारीस मारहाण करणे, शासकीय कर्मचारीस धमकी व दमदाटी करणे, जमावबंदी आदेश असताना जमाव जमवून शासकीय कर्मचारीस धाक देणे, दबाव आणणे, महिलेचा विनयभंग करणे, महिलेस लज्जा येईल अशा अश्लील भाषेत शिविगाळ करणे, सदर महिला आदिवासी समाजाची असल्यामुळे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावेत व आरोपीस तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच सदर नगरसेवकाचे पद व त्याचे रेती वाहतूक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.
सदर घटनेत आरोपी नगरसेवकाच्या गैरकृत्यात शामिल असणाऱ्या व आरोपीस साथ देणाऱ्या ट्रक-डंपर ड्रायव्हर व इतर संबंधित आरोपींवरही कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. तरी दोषी नगरसेवकावर तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्र युवा आघाडी राज्याध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी प्रशासनाकडे केली आहे.