मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा, पण इतर कोणत्याही आरक्षणला धक्का नको – मंत्री छगन भुजबळ
# आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी ओबीसींची जनगणना आवश्यक !
नाशिक / मुंबई. (विशेष प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा, पण इतर कोणत्याही आरक्षणला धक्का नको तसेच आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी ओबीसींची जनगणना करण्याची आवश्यकता असल्याचे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रवादी चर्चा उपक्रमाद्वारे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना व्यक्त केले आहे.
यावेळी भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबत व्ही.पी.सिंग सरकारच्या काळात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रात पवार साहेबांनी मंडल आयोगाची अमलबजावणी करून ओबीसींना आपले अधिकार मिळवून दिले. या ओबीसी वर्गाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी ओबीसींची जनगणना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत हा प्रश्न मांडून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनगणना करण्यास पाठपुरवा केला. मात्र अद्याप देखील ती आकडेवारी जनतेसमोर आलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळात चर्चा करण्यात आलेली आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मराठा आरक्षणाला आपला पाठींबा आहे. ओबीसी आरक्षणाला तसेच इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. ही मागणी सर्व पक्षीयांनी मान्य केली आहे. त्यानुसार शासनाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. नुकतेच मुख्यमंत्री आणि शिष्ठमंडळ पंतप्रधानांची भेट घेतली आहे. केंद्राच्या मदतीने हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. मराठा बांधवाना आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची आवश्यकता आहे. ही वाढ करण्यासाठी शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेच्या अनेक प्रश्नांना थेट आणि जे काही आहे ते स्पष्टपणे सांगत प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गोर गरिबांची सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून घेवूया असे आवाहन त्यांनी शेवटी केले.