म्युकरमायकोसिस आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा – मिलिंद सरदेशमुख
मुंबई. (प्रतिनिधी) – म्युकरमायकोसिस या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड व अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना केली आहे.
सद्यस्थितीत राज्यात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य गंभीर आजाराची लागण वाढू लागली आहे. याबाबत शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणेबाबतच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याबद्दल संघटनेने आभार व्यक्त केले आहेत. परंतु अजुनही करोना बाधितांचे उपचार मोठ्या संख्येने सुरू असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. या रुग्णांमध्ये शासकीय कर्मचारीही आहेत. खाजगी रुग्णालयातील सदर वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिपुर्ती मिळण्यासाठी या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत समावेश करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांना उपचाराचा खर्च नियमानुसार प्राप्त होईल असे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.
# संघटना अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी
शासकीय कर्मचाऱ्यांना विविध २७ गंभीर आजारांच्या उपचाराच्या खर्चाची परिपुर्ती अनुज्ञेय असुन शासनाने अलिकडेच करोनाचाही गंभीर आजारांच्या यादीत समावेश केला आहे. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिस हा गंभीर आजार असल्याने त्याचाही समावेश सदर यादीत करावा अशी मागणी केली आहे.