09 ऑगस्ट क्रांति दिनानिमित्त ‘मोदी हटाव, देश बचाव!’ आंदोलन ऐतिहासिक करू – डॉ. अशोक ढवळे
मुंबई. (प्रतिनिधी) – 09 ऑगस्ट क्रांति दिनानिमित्त ‘मोदी हटाव, देश बचाव!’ या आंदोलनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आव्हान अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माकप नेते डॉ. अशोक ढवळे यांनी केले आहे.
यावेळी डॉ. ढवळे म्हणाले की, शेतमजूर व शहरी, ग्रामीण श्रमिकांवरही कोरोना काळात अत्यंत निष्ठर हल्ले केले गेले. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनची कुठलीही पूर्वतयारी न करता ज्या शेखचिल्ली थाटात घोषणा करण्यात आली. त्यामुळे स्थलांतरित मजुरांना हातावर पोट असलेल्या शहरी व ग्रामीण श्रमिकांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या. शहरातून जीव मुठीत धरून गावांकडे परतणाऱ्या हतबल श्रमिकांच्या या काळातील काळीज पिळवटून टाकणाऱ्या वेदना आपण पाहिल्या. महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे हजारोंच्या संख्येने पायी चालत गेलेल्या मजुरांच्या व त्यांच्या लेकराबाळांच्या यातना अजूनही ताज्या आहेत. चालत निघालेल्या मजुरांचे रेल्वे रुळांवर चिरडून पडलेले छिन्नविच्छिन्न मृतदेह आपण विसरलेलो नाही. रस्त्याच्या कडेला प्रसबकळा देत प्रसूत होणाऱ्या रक्त बंबाळ आया अजूनही आपल्या डोळ्या समोरून हलायला तयार नाहीत. ग्रामीण भागात परतलेल्या या मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. सरकारने मात्र याबाबतही काहीच केले नाही. उलट रोजगार हमी योजनेला सुरुंग लावला गेला. रेशनचा काळा बाजार फोफावेल अशा प्रकारची अंदाधुंदी करून गोरगरिबांच्या अन्नात माती कालविली गेली. अत्यंत निर्दयी पद्धतीने कर लावून पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवले. महागाई सातत्याने वाढत राहिल्याने सामान्यांचा जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील 09 ऑगस्ट हा अत्यंत क्रांतिकारी आंदोलनाचा दिवस आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली याच दिवशी भारतीय जनतेने क्रूर इंग्रज सरकारला ‘चले जाव’ सांगत आरपार आंदोलनाची सुरुवात केली होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सर्वात क्रूर, पाशवी, मागास, धर्माध, कॉर्पोरेट धार्जिण्या व जनता विरोधी सरकारलाही आपण 09 ऑगस्टच्या दिवशी ‘चले जाव’ निर्वाणीचा इशारा देत आहोत. संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनांची संघर्ष समिती, सीटू, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या सर्व संघटनांनी एकत्र येत या आंदोलनाची हाक दिली आहे.
या पाश्वभूमीवर आपण सर्वांनी या आंदोलनात आपल्या संपूर्ण ताकदीने सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही राज्यातील जनेतला करत आहोत, त्या अनुषंगाने दि. 09 ऑगस्टचे ‘मोदी हटाव! देश बचाव!’ आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत ऐतिहासिक प्रमाणात यशस्वी करू या असे आव्हान देखील अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माकप नेते डॉ. अशोक ढवळे यांनी केले आहे.