आदिवासी महिलांना मारहाण करणाऱ्यांवर कार्यवाही करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई / वसई. ( प्रतिनिधी ) – आदिवासी महिलांना मारहाण करणाऱ्यांवर कार्यवाही करा असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोकण विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांना पत्र पाठवून दिल्या आहेत. तर गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या याप्रकरणाबाबत पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पालघर कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे,विमल माणक्या पुंजारा,सोनम सबू भोईर,सीता संताराम भोईर, तारु सुभाष डोकफोडे मूळ राहणार कावडास, कासा पालघर ह्या पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी राहतात. या महिला वसईत बिगारी काम करतात. शुक्रवारी या महिला पापडी येथे बाजारातून काम करून घरी जाताना काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आल्याचे सांगत पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात भरून पापडी चौकीत नेले आणि येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि तेथील पोलीस कर्मचारी त्यांना दंडुक्याने मारहाण करत चोरीचा आळ घेतला आणि त्यांना पुन्हा बाजारात न दिसण्याची धमकी दिली. केवळ संशयावरुन आदिवासी महिला पोलिसांच्या ताब्यात घेतले व याबाबत नोंदच पोलिसांच्या दफ्तरी नसल्याने आश्चर्य आहे. असे त्या म्हणाल्या.
तसेच यावर वस्तुस्थितीची चौकशी करावी, सविस्तर चौकशी करण्यासाठी स्वतंत्र उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमावा, सदर घटना घडली किंवा कसे याबाबत चौकशी करावी, सदर महिलांना मारहाण झाली असल्यास त्याबाबत ही माहिती घ्यावी, सदर महिला चोरी करण्याच्या उद्देशाने बाजारात आल्या होत्या का ? या पूर्वी त्यांच्यावर कोणते गुन्हे नोंदवले गेले आहेत का ? जर निष्कारण मारहाण झाली असल्यास संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर आवश्यक कारवाई करावी, असे असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोकण विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांना पत्र पाठवून दिल्या असून याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.