आ. झिशान सिद्दीकी देणार हिजाबबंदी विरोधात कायदेशीर मदत
मुंबई. ( प्रतिनिधी ) – मुस्लीम मुलींच्या शालेय हिजाबबंदीला वैध ठरवण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाने माझ्यासह देशातले असंख्य लोक निराश झाले आहेत. हिजाबबंदीविरोधात न्यायालयात गेलेल्या लोकांनी याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. मी व्यक्तीशः त्यांना पूर्ण कायदेशीर मदत करीन, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आमदार झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली आहे.
या निर्णयाने माझ्यासह देशातले कित्येक लोक दुःखी झाले आहेत. हा विषय इतका पुढे जाण्याची गरजच नव्हती. इतके वर्षे आमच्या पूर्वीच्या पिढ्यातल्या महिला, आमच्या आई, आजी हिजाब परिधान करून वावरत होत्या. तेव्हा कधी समस्या निर्माण झाली नाही. मग आजच ही का निर्माण होत आहे? भारतीय जनता पार्टी या विषयाचा राजकीय वापर करत आहे, असेही ते म्हणाले. हिजाब गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्कानचे मनोबल वाढवण्यासाठी कर्नाटकला जाताना मी तिलाही भेटलो होतो. तिने जी बहादुरी दाखवली, जे धाडसी पाऊल टाकले, त्याबद्दल संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. मुस्लीमच नाही तर कोणत्याही धर्मातल्या मुलीला, महिलेला स्वतःच्या शीलाच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी, सुरक्षेसाठी हिजाबसारखे एखादे वस्त्र वापरायचे असेल तर कोणाला आपत्ती वाटण्याचे काही कारण नाही. परंतु काहींना निव्वळ राजकारण करायचे असते. हिजाब शाळांसाठी अनिवार्य न करण्याचा निर्णय ही न्यायालयाची भूमिका असू शकते. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कुणाच्या तरी माथी थोपवता तेव्हा त्याचे परिणाम दिसतातच. या निर्णयामुळे मुस्लीम मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी होऊ शकते. शाळा, महाविद्यालयात एखादे वस्त्र परिधान करण्याबाबत स्वातंत्र्य दिल्याने काही नुकसान होणार नाही, अशा भावनाही झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केल्या. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.