रा. स्व संघाच्या विचारसरणीत आणि आपल्यात समानता – उद्धव ठाकरे
# " द कश्मीर फाईल्स " चित्रपटावरून भाजपा – शिवसेना मध्ये राजकीय रणकंद
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीत आणि आपल्यात समानता असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांवर जोरदार तोफ डागली आहे.
यावेळी ठकारे म्हणाले की, कश्मीरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा तिथे भाजपने पाठिंबा दिलेल्या पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचेच सरकार होते. आता जो मायेचा पूत त्यावर अश्रू ढाळतोय त्यात तेव्हा ब्र काढण्याही हिंमत नव्हती, असे ठणकावताना तेव्हा एकच आवाज… ज्यांनी गर्जना केली ते होते हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, हा हिंदुत्वाचा अभिमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांत जागवला. राजकारणासाठी हिंदुत्वाचा बुरखा पांघरणारे नवहिंदू हे हिंदुत्वाचा, छत्रपती शिवरायांचा आणि शिवसेनेचा भगवा बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिजाब पांघरलेल्या या नवहिंदूंना राजकारणातून नेस्तनाबूत करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणार्या ‘एमआयएम’सोबत मेलो तरी जाणार नाही, असे ठणकावून सांगताना भाजपचे हे डाव ‘शिवसंपर्क अभियाना’च्या माध्यमातून जनतेसमोर पोहोचवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना केले. शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’ मंगळवारपासून सुरू होत आहे. या अभियानाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना खासदार तसेच संपर्कप्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना मुस्लिम धार्जिणी झाली आहे असा गैरसमज पसरवण्याचा भाजपचा डाव आहे. शिवसेनेला जनाब म्हणायला यांनी सुरुवात केली आहे. आपल्याला ते हिंदूविरोधी ठरवू पाहताहेत. एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की ज्यामुळे सगळे संमोहित होतील आणि वस्तुस्थिती विसरून जातील. आधी इस्लाम खतरे में है अशी बांग दिली जायची, आता हिंदुत्व खतरे में है, अशी एक नवीन बांग भाजपने द्यायला सुरुवात केली आहे. अशा वेळी सत्य काय आहे हे गावोगावी आणि घरोघरी जाऊन आपल्याला सांगयला हवे. तसेच ” द कश्मीर फाईल्स ” चित्रपटाच्या माध्यमातून भाजपचा सुरू असलेला छूपा प्रचार, ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या ऑफरच्या माध्यमातून शिवसेनेला मुस्लिम धार्जिणे ठरविण्याचा भाजपचा डाव याचा समाचार घेत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा हिजाब उतरवला.
# इतिहास घडवला म्हणून जे दंड थोपटताहेत, त्यांची नावेसुद्धा कश्मीरी जनतेला माहीत नव्हती..!
चित्रपटाच्या माध्यमातून एक ‘फाईल’ उघडली गेलीय. पण तो काळ आठवा, ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी आपल्या देशाच्या बाजूने मुस्लिम आहेत त्यांच्यावर अत्याचार झाले. जगमोहन हे तेव्हा कश्मीरचे गव्हर्नर होते. तेव्हा त्यांनी कश्मीरीपंडितांना कश्मीर सोडायला सांगितले. कदाचित त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी असेल, पण तेव्हा सरकार कोणाचे होते? भाजपने समर्थन दिलेल्या व्ही. पी. सिंग यांचे. त्यावेळी व्ही. पी. सिंग यांना शिवसेनेने विरोध केला होता, कारण ते पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही मंदिरात गेले नव्हते तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन तिथल्या इमामाला भेटून आले होते. तेव्हा भारतीय जनता पक्षाने एक अवाक्षर काढले नव्हते किंवा त्यांचा पाठिंबा काढला नव्हता. कश्मीरात सुरू असलेल्या अत्याचारांविषयीही भाजपने अवाक्षर काढले नव्हते. एकच आवाज… ज्यांनी गर्जना केली ते होते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. जो कोणी मायेचा पूत जो आज अश्रू ढाळत आहे तरी या अत्याचारांविरोधात ब्र काढण्याची त्यांची हिंमत नव्हती, हे सत्य आहे. हे सत्य जर मांडायचे असेल तर सर्व सत्य जनतेसमोर येऊ द्यात. पण पिढी बदलल्यानंतर आज आम्ही नवीन काही तरी इतिहास घडवला म्हणून जे दंड थोपटताहेत त्यांची नावेसुद्धा कश्मीरी जनतेला माहीत नव्हती. अमरनाथ यात्रा रोखल्यानंतर ‘जर ही यात्रा रोखली तर हजयात्रा मी होऊ देणार नाही. इथून एकही विमान हजला जाणार नाही,’ हे दुसरे कोणीही बोलले नव्हते. अतिरेक्यांना तेव्हा अंगावर घेणारे केवळ एकच मर्द होते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते दुसरा कोणीही नव्हता, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच शिवसेना भवन ‘हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ या जयघोषाने दणाणून गेले.
# आधी हिंदुत्व म्हणजे काय, मोहन भगवतांच्या भाषेत समजून घ्या..!
शिवसेना मुस्लिम धार्जिणी झाली आहे, हा गैरसमज पसरवण्याचा यांचा डाव आहे. शिवसेना मुस्लिम धार्जीणी म्हणताना सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणालेत हेही आठवा. जर तुम्ही शिवसेनेला जनाब म्हणणार असाल तर भाजपवाले मोहन भागवत यांच्या वक्तव्यांना काय म्हणणार ? आधी हिंदुत्व म्हणजे काय हे त्यांच्याच भाषेत पूर्ण समजून घ्या. मोहन भागवतांनी लिहिलेय, ‘सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हेत त्यांनी उर्दूत गझल लिहिल्या आहेत.’ मोहन भागवतच म्हणालेत ‘संघ का विचार, हिंदुत्व का विचार है। अपनी अपनी विविधतापर चलते रहो। बाकी सब की विविधताओं का विचार करो. मिलजुलकर चलते रहो। हिंदू का धर्मशास्त्र ‘हिंदू’ नाम से नही है, उसे ‘मानवता धर्म शास्त्र’ नाम से जाना जाता है। हिंदुराष्ट्र मतलब इसमे मुसलमान नही चाही है ऐसा नही है। जिस दिन ये आजायेगा की इसमे मुस्लिम नही चाही है, उसदिन वह हिंदुत्व नही रहेगा।, हे कोण म्हणालेत तर मोहन भागवत. जर भाजपकडे मोदी, अमित शहा आहेत, महाराष्ट्रात भाजपचे दलाल प्रवक्ते आहेत ते यावर उत्तर देऊ शकतील का? असा परखड सवाल करताना तुमची सत्तेची स्वप्ने उधळून लावली म्हणून तुम्ही आम्हाला मुस्लिम धार्जिणे ठरवणार असाल तर कदापि सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
# राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचे का ?
काही दिवसांपूर्वीच बातमी आली आहे की संघ मुस्लिम वस्त्यांत शाखा तयार करणार आहे. मग या मुस्लिमांचे काय करायचे आणि पुन्हा आरएसएसला काय म्हणायचे? राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचे? भागवतांच्या नावापुढे काय खान किंवा जनाब जोडणार आहात? भागवतांच्या हिंदूत्वाचे विचार हे शिवसेनेच्या विचाराशी काही प्रमाणात मिळतेजुळते आहेत, पण त्यांच्या शिकवणीकडे लक्ष न देता आपण म्हणजे देशप्रेमी आणि बाकी आम्हाला विरोध करणारे देशद्रोही हा जो कांगावा चाललाय तो फार वाईट आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले.
# एमआयएमबरोबर जाणे कदापि शक्य नाही.
मध्येच काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली. काय संबंध आहे? कधी दुरान्वयेही आम्ही एमआयएमच्या बाजूने जाऊ शकत नाही. पण हाच तो डाव आहे. एमआयएमने ऑफर द्यायची आणि भाजपने भडीमार सुरू करायचा की एमआयएम सोबत जाणार. शिवसेना औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही, एवढी आमची कडवट हिंदुत्वाची निष्ठा आहे. असे असताना हा प्रश्न मध्येच उकरून आम्ही हिंदुत्वापासून दूर जातोय हे दाखवायचं. आम्ही भाजपसारखे सत्तेसाठी लाचार नाही. एमआयएमबरोबर जाणे कदापिही शक्य नाही. अफझल गुरूला फाशी देऊ नका असे सांगणार्या मेहबुबा मुफ्तीच्या मांडीला मांडी लावून जी काही सत्तेसाठी मांडीघाशी केलीत, तेवढा निर्लज्जपणा शिवसेनेत कदापिही येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही. जर जनाब शिवसेना म्हणत असाल तर मेहबुबा मुफ्तीसोबत जाणार्या तुम्हाला हिजबूल जनता पक्ष म्हणायचा का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.