आपला जिल्हा

दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; अन्यथा उग्र आंदोलन – प्रविण दरेकर

# प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नका – दरेकर यांच्या नेतृत्वात बोरिवलीमध्ये आंदोलन

मुंबई. (प्रतिनिधी) कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पश्चिम स्थानकाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नका. दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अन्यथा टोकाचे उग्र आंदोलन करू, असा इशारा प्रविण दरेकर यांनी आदोलनावेळी दिला.

बोरिवली पश्चिम स्थानकाबाहेर रेल्वे प्रवासाबाबत जोरदार आंदोलन करताना जनआक्रोश

कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे केली होती. परंतु राज्य सरकारने अद्यापही कोणतीही दखल घेतली नाही याकरता भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, लोकांना कोविड काळात काम नाही. मुंबईत कामाकरता खाजगी वाहनांनी येण्यासाठी रोज ७०० -८०० रुपये मोजावे लागत आहेत. बसने येण्यासाठी नागरिकांना तीन ते चार तास लाईनमध्ये तिष्ठत उभे राहावे लागते. जर बसमध्ये प्रवास करण्यास मुभा आहे तर रेल्वेने प्रवास करण्यास मुभा का नाही? नागरिकांचे खाजगी वाहन व बसने प्रवास करताना त्रासाला समोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत सामान्य चाकरमन्यांची नोकरी धोक्यात येत असून सर्वसामान्य माणसाने एवढा पैसा आणायचा कुठून ? असा सवाल दरेकर यांनी केला. कोरोनाच्या महामारीमुळे रेल्वे सर्वसामान्यांना बंद करण्यात आली होती. पण जनता कोरोनाने मरणार नाही तर उपमासमारीने मरेल. मुख्यमंत्री अहंकारापोटी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेत नाहीत. अनेक पक्षांतील नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे रेल्वे सुरू करण्याची मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्री काही केल्या ऐकायला तयार नसून हे अहंकारापोटी केले जात आहे. हे सरकार निष्क्रिय आणि उदासीन आहे असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. प्रविण दरेकर यांनी सांगितले की, आम्ही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही रेल्वे सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. रेल्वे हा केंद्राचा विषय आहे. पण आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याला अधिकार आहेत. राज्याने अनुकुलता दर्शविल्यास व निर्णय घेतल्यास रेल्वेची तशी तयारी आहे. पण केवळ अहंकारापोटी मुंबईची लाईफलाईन सुरू केली जात नाही. आजचे आंदोलन ही तर केवळ सुरुवात आहे, या पुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, रेल्वे सुरू करण्यासाठी आघाडी सरकारने तोडगा काढावा, इशारा प्रविण दरेकर यांनी दिला.

राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे रेल्वे प्रवाशांच्या न्याय्य हक्कासाठी भाजप पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलनानंतर कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी याकरता बोरिवली स्टेशन मास्तर घोष यांना याबाबत निवेदन दिले. त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, प्रकाश दरेकर यांच्यासह नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे