आपला जिल्हा

आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई. (प्रतिनिधी) राज्यात एकीकडे शहरीकरण वाढत असताना आदिवासी समाजाने आपले मातीशी असलेले नाते जपले आहे. मुंबईतील आरेचा ८०८ एकर परिसर जंगल घोषित झाल्याने येथील स्थानिक आदिवासींना सर्वाधिक आनंद झाला आहे. येथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी ज्या मूलभूत सोयी सुविधा उभारणे गरजेचे आहे, त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदिवासी बांधवांच्या उन्नतीकरिता शासन कटिबद्ध असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप द्यायला सांगितल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक अन्नधान्य किट वाटपाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी आरे कॉलनीतील खांबाचा पाडा येथील ५२ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाकरे म्हणाले, खावटी अनुदान वाटप हे आपले कर्तव्यच आहे. तथापि आरेमधील जंगल वाचविले, त्याचबरोबर येथील आदिवासींच्या उन्नतीसाठी काम करणे गरजेचे आहे. यासाठी वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नियोजन केले जाईल. वातावरणीय बदलांमुळे जगभर पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. महाराष्ट्रातही आपण विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत आहोत. अनेक ठिकाणी दरड कोसळून अपघात होत आहेत. त्याअनुषंगाने जेथे आवश्यक आहे तेथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तथापि, अधिक पाऊस पडत असल्याने रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आदिवासींनी आरे परिसरात स्वतः पिकविलेल्या भाज्या तसेच तारपा वाद्य देऊन मंत्री ठाकरे यांचे स्थानिकांमार्फत स्वागत करण्यात आले.

यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण आदी उपस्थित होते. खावटी अनुदान हे चार हजार रुपयांचे असून त्यात दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू आणि दोन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे