पदोन्नतीतील आरक्षणाचे विधेयक फाडणाऱ्यांचे ‘समर्थनकर्ते’ समाजहिताचे पुरस्कर्ते नाहीत ! – बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजने
मुंबई. ( प्रतिनिधी ) – पदोन्नतीतील आरक्षणाचे विधेयक फाडणाऱ्यांचे समर्थनकर्ते समाजहिताचे पुरस्कर्ते नाहीत. हे विधेयक पारित झाले असते तर त्याचा फायदा अनुसूचित जाती, जमातीला झाला असता. परंतु,हे विधेयक फाडणाऱ्यांचा पुळका कुणाला येत असेल तर ही लोकं समाजहिताचे पुरस्कर्ते होवू शकतात का ? असा संतप्त सवाल बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांनी उपस्थित केला.
डिसेंबर २०१२ मध्ये अनुसूचित जाती आणि जमातीला पदोन्नतीतील आरक्षणाचे विधेयक बहुजन समाज पार्टी ने राज्यसभेत पारित करून घेतले होते. पंरतु, लोकसभेत तत्कालीन संसदीय कामकाज मंत्री नारायण सामी पदोन्नतीतील आरक्षणाचे विधेयक सादर करीत असतांना समाजवादी पक्षाचे खासदार यशवीर सिंह यांनी त्यांच्या हातातून हे विधेयक हिसकावून घेत ते फाडले होते. समाजवादी पक्षाची भूमिका सदैव दलित विरोधी राहीली आहे. उत्तर प्रदेशात हा पक्ष सत्तेवर असतांना दलित आणि अतीव पीडितांना त्यांनी सापत्न वागणूक दिली. कुणाच्या आवाहनाने मते फिरायला उत्तर प्रदेश काही महाराष्ट्र नाही. यूपीतील मतदार हा फुले – शाहू – आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम जींच्या विचारांचे वारसदार आहे. कुणाच्या आवाहनाने तो मतदान फिरवेल असे कदापी होणार नाही. शासन – प्रशासन – अनुशासन सरकार कुणाचे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मा.बहन सुश्री मायावती जी यांच्या नेतृत्वावर त्यांचा अतुट विश्वास आहे. अशात दलित, पीडित, शोषित विरोधी विचारधारेला मतदार करून ते समाजासोबत दगाफटका करणार नाहीत, असे प्रतिपादन अॅड. ताजने यांनी केले.