नवी दिल्ली. (प्रतिनिधी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील महापूरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, महापूरात नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांना विमा कंपन्या नुकसानभरपाई देण्यास अवास्तव कारणे सांगून टाळाटाळ करत आहेत. विमा कंपन्या पूरग्रस्तांना झालेल्या नुकसानाचे पुरावे मागत आहेत. पूरात सगळे नष्ट झाले असताना, पुरावे कुठून देणार ? ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. तसेच, लवकरात लवकर नुकसानभरपाई न मिळाल्यास पूरग्रस्त शेतकरी, व्यापारी देशोधडीला लागतील. यामुळे केंद्र शासनाने याची वेळीच दखल घेऊन नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई तात्काळ देण्याबाबत विमा कंपन्यांना निर्देश द्यावेत. त्याचबरोबर ज्या नुकसानग्रस्तांनी कोरोना, लॉकडाऊन अथवा अन्य काही कारणांनी विमा उतरविला नव्हता, अशांना केंद्र शासनाकडून मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. यावर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच याविषयी योग्य ती कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली आहे.