महाराष्ट्र

तिसरी लाट येणार हे सरकारला माहीत आहे तर आता तरी कोरोनाचे उपचार मोफत करा – उमेश चव्हाण

सोलापूर. (प्रतिनिधी) – लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था तितकीशी सक्षम नाही, म्हणून कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत लोकांची इच्छा नसताना लॉकडाऊनचा पर्याय माथी मारण्यात आला. या आधी पहिल्या दोन लाटा येणार हे सरकारला माहीत नव्हतं, मात्र आता तिसरी लाट येणार हे सरकारला ठामपणे माहित आहे. तसेच या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होणार हेही सरकार कडून वारंवार सांगितले जात असताना, मात्र त्यासाठी उपाययोजना काय केल्या? हे सांगितले जात नाही. दोन लाटांमधून सरकारने थोडा फार जरी धडा घेतला असेल तरी तिसऱ्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे उपचार लोकांना मोफत मिळाले पाहिजेत, अशी रुग्ण हक्क परिषदेची भूमिका असल्याचे मत परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मांडले.

आधी कोरोनाचे उपचार कसे केले जातात ? RT-PCR टेस्ट म्हणजे काय ? अँटीजेन टेस्ट म्हणजे काय ? रेमडीसेवियर इंजेक्शन – टॉसिलिझुम्याब इंजेक्शन, इम्युनिटीपॉवर वाढीची औषधे, ऑक्सिजन ट्रीटमेंट आणि उपचारांबाबतची सगळी माहिती आता लोकांनाही तोंडपाठ झाली आहे. पहिल्या आणि दूसऱ्या लाटेमुळे जे अनुभव सरकारला आले, त्यातून सरकार थोडे तरी शहाणपण दाखवणार आहे का ? असे अनेक सवाल उमेश चव्हाण यांनी उपस्थित केले. लहान मुले ही देशाची संपत्ती आहे, उद्याचे भविष्य आहेत. या मुलांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये. उपचारादरम्यान ही मुले विकलांग होऊ नयेत, देशाची भावी पिढी अशक्त आणि अपंग उपजु नये, म्हणून ही लाट येऊच नये यासाठी सरकार काय करणार ? हे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढे येऊन सांगितले पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. तिसऱ्या लाटेतील बाधित रुग्णाला मोफत उपचार मिळाले पाहिजेत. सरकारी बेड उपलब्ध न झाल्यास खाजगी ठिकाणी उपचार घेतले असतील तर रुग्णाच्या खात्यावर थेट एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीतून उध्दव ठाकरेंनी करावी, अशी आमची मागणी असल्याचे उमेश चव्हाण म्हणाले. याआधी रिक्षा चालकांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा झाली, मात्र अजूनही अनेक लोक लाभापासून वंचित आहेत. जर लोकांनीच समस्यांना तोंड द्यायचे असेल, सरकार कर्जबाजारी असेल तर किती दिवस कर्ज काढून उपचार करायचे ? असा सवालही उमेश चव्हाण यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला रुग्ण हक्क परिषदेचे राज्य सचिव संजय जोशी, प्रदेश संघटक गिरीश घाग, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय लोहार, माढा तालुका अध्यक्ष आकाश घोडके, चेतन शिंदे, बार्शीचे बाबा चौबे, रुग्ण हक्क परिषदेचे विश्वस्त भगवान परळीकर उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे