हिंदू पणाची जाणीव हेच समस्यांचे उत्तर – सुनील आंबेकर
# सा. विवेक च्या "संघ मंत्र के उद्गाता डॉ हेडगेवार " या हिंदी अंकाचे प्रकाशन
मुंबई. ( प्रतिनिधी ) – सा. विवेक सामाजिक परिवर्तनासाठी काम करणारे साप्ताहिक असून विविध ग्रंथ व पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासोबत राष्ट्रीय विचाराचा प्रसार आणि प्रचार करत असते. त्यातील एक भाग म्हणजे ” संघ मंत्र के उद्गाता डॉ हेडगेवार ” हा अंक होय. या अंकाचे प्रकाशन काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आखिल भारतीय प्रचार प्रमुख मा.सुनीलजी आंबेकर यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी सुरेश भगेरिया ( मुंबई महानगर संघचालक ) रमेश पतंगे (अध्यक्ष हिंदुस्थान प्रकाशन संस्था) दिलीप करंबेळकर (प्रबंध संपादक विवेक समुह) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर व संघ कार्यकर्ते उपस्थित होते. या अंकाचा परिचय सा.विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी करून दिला.

अंकाच्या प्रकाशनानंतर बोलताना सुनीलजी आंबेकर म्हणाले,” आज संघ समजून घेऊ इच्छिणाराची संख्या वाढत आहे. जगाने संघाकडे आशेने डोळे लावले आहेत. संघ विचारात जगाला आशेचा किरण दिसतो आहे. आपल्या समस्यांवर संघच उत्तर देऊ शकतो अशी सामाजिक मानसिकता तयार झाली आहे. त्याच बरोबर संघाची कार्यपद्धती चांगली असून आपण संघाच्या सोबत गेलो तर बदल घडवून आणू शकतो हा सामाजिक अनुभव आता येतो आहे. याच्या मुळाशी डॉक्टर हेडगेवार यांची संघटनसूत्र, विचार सूत्र आहेत. आज डॉक्टर हेडगेवार यांच्या चरित्राबरोबरच विचार सूत्रांचा अभ्यास केला जातो आहे. आपल्या स्नेहपूर्ण व्यवहारातून डॉक्टर हेडगेवारांनी अनेक समाज धुरीणांना आपलेसे केले. सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. ही त्यांची कार्यपद्धती होती. हिंदू समाजाच्या समस्या समाप्त व्हायच्या असतील तर आपले हिंदूपण जागृत केले पाहिजे हे डॉक्टर हेडगेवारांनी दिलेल्या सूत्रांच्या आधारे संघ ९६ वर्ष प्रवास करत आहे. आज देश विदेशात संघविचाराचे प्रकटीकरण होताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या राममंदिर निधी संकलन अभियानातून संघाचा विस्तार आणि समाजाची विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी ची अनुभूती आली. डॉक्टर हेडगेवारांनी दिलेली विचारसूत्र आपले ध्येय मानून काम करणारे संघस्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी उभे आहेत. कोरोना काळात याचा अनुभव आला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात डॉक्टर हेडगेवारांच्या विचार सूत्राचे प्रकटीकरण करण्यासाठी अशा अंकाचा उपयोग होणार आहे.” प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे सुरेश भगेरिया मार्गदर्शन करताना म्हणाले की, ” डॉक्टर हेडगेवारांनी दिलेल्या विचारसूत्रावर काम करत आपण संघाच्या शताब्दी कडे जात आहोत.संपूर्ण जगाकडून संघविचार समजून घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.देशासाठी जगणाऱ्या संघस्वयंसेवकाच्या निर्मिती ची ताकद डॉक्टर हेडगेवारांच्या विचार सूत्रात आहे. आज असे असंख्य संघस्वयंसेवक राष्ट्र सेवेसाठी तत्पर आहेत. त्यामागील प्रेरणा डॉक्टर हेडगेवार हेच आहेत. या प्रकाशन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी मयेकर ( कार्यकारी संपादक ) यांनी केले. तर आभार अजय कोतवडेकर यांनी मानले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.