ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना अडचणींचा सामना करावाच लागणार – मंत्री छगन भुजबळ
# समतेचे काम पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम करा.
धुळे. ( प्रतिनिधी ) – ओबीसींच्या न्याय हक्का साठी लढणाऱ्या प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र या अडचणींना न घाबरता आपल्याला पुढे जायचे आहे हा लढा निकराने लढायचा आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सध्याचा काळ हा ओबीसींच्या संक्रमणाचा, परिक्षा घेणारा काळ आहे. मात्र आपल्याला त्यावर मात करत पुढे जावे लागणार आहे. सामाजिक न्यायासाठी संघटनेची आवश्यकता होती.त्या आधारावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करण्यात आली. गोरगरिबांचं दुःख कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना संघटनेच्या माध्यमातून काम करायचं आहे.ओबीसींची लढाई ज्यांनी ज्यांनी हाती घेतली त्यांना त्रास देण्याचे काम केलं. देशात अजूनही मनुवादी प्रवृत्ती जिवंत आहे. त्यामुळे त्रास हा होणारच आहे. त्यामुळे घाबरून चालणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महापुरुष आपली दैवत आहे. महात्मा जोतीराव फुले सावित्रीबाई फुले यांनी महिलांना समाजात महत्वाचे स्थान उपलब्ध करून दिले.प्रगत शेती आणि शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची कल्पना त्यांनी त्या काळात मांडली. जाती व्यवस्था नष्ट करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. महात्मा फुले यांनी शिक्षण द्या आणि कामं वाटून घ्या जातीच्या प्रमाणे असे सांगितले हेच आरक्षण आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसी समाज का मागे राहिलात यासाठी इतिहासाची पान वाचने गरजेची आहे. त्यासाठी महात्मा फुले यांचे साहित्य वाचावे. हे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी त्यांचे साहित्य भेट वस्तू म्हणून द्या असे आवाहन केले. तसेच आपण या महापुरुषांचे वारसदार आहोत. पण वारसदार म्हणून घेण्याचा हक्क तेव्हा प्राप्त होईल जेव्हा आपण त्यांच्या विचारांवर पाऊलं टाकू तेव्हाच आपण वारसदार होऊ शकू असे त्यांनी यावेळी सांगितले.महाविकास आघाडी सरकार हे फुले शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांवर काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक,किरण पाटील, राजेश बागुल, सतीश महाले, बापू महाजन,रणजित राजेभोसले,नेरकर, सतीश बाविस्कर, राजेंद्र चौधरी, राजेंद्र वाघ, गोपाळ देवरे,भगवान करनकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.