२७ सप्टेंबर, रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या ” भारत बंद ” आव्हानाला सर्व पक्षीय पाठींबा !
मुंबई. ( प्रतिनिधी ) – संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या धोरणांविरुद्ध दि. २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ यशस्वी करण्याची बुलंद हाक दिली आहे. देशातील व महाराष्ट्रातील सर्व डाव्या व धर्मनिरपेक्ष पक्षांनी या बंदला संपूर्ण पाठिंबा दिलेलाच आहे, शिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांनी बंदला सक्रिय समर्थन देणारी अधिकृत निवेदने प्रसिद्ध केली आहेत. अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात हा बंद यशस्वी करण्यासाठी दि. २० सप्टेंबरला मुंबईत भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी येथे राज्यातील भाजप – विरोधी राजकीय पक्ष व जनसंघटनांची बैठक झाली होती. त्यात शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटित कामगार, कर्मचारी, महिला, विद्यार्थी, युवा, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध विभागांच्या सुमारे १०० संघटनांचे २०० हून अधिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. संयुक्त किसान मोर्चाने दि. २७ सप्टेंबरला सकाळी ०६ ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयटक चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कानगो हे होते. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सध्या सुरू असलेले ऐतिहासिक शेतकरी व कामगार आंदोलन, मोदी-शहा प्रणित भाजप-आरएसएस सरकारच्या धोरणांविरुद्ध होणार असलेल्या भारत बंद चे महत्त्व, आणि या बंद ला देशभरातून मिळत असलेले जबरदस्त समर्थन याची माहिती दिली. गेले १० महिने लाखो शेतकरी दिल्लीच्या सहा सीमांवर ठाण मांडून बसले आहेत आणि या अभूतपूर्व लढ्यात आजवर ६०० हून अधिक हुतात्मे झाले आहेत. दि. ५ सप्टेंबरला संयुक्त किसान मोर्चातर्फे उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर येथे १० लाख शेतकरी – कामगारांची ऐतिहासिक महापंचायत झाली आणि तिने मिशन उत्तर प्रदेश – उत्तराखंडचे उदघाटन केले. दि. २२ जानेवारी नंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांशी बोलणी तोडली आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात भारत बंद प्रचंड यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
ज्या मुख्य मागण्यांभोवती या भारत बंद ची हाक देण्यात आली आहे, त्या पुढीलप्रमाणे आहेत: जनविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे तीन कृषी कायदे व चार श्रम संहिता रद्द करा; वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या; संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव शेतकऱ्यांना मिळेल यासाठी केंद्रीय कायदा करा; संपूर्ण देश कॉर्पोरेट कंपन्यांना विकून टाकणारे खासगीकरणाची नीती बंद करा; डीझेल, पेट्रोल, गॅस व सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव निम्मे करा; महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामाचे दिवस आणि वेतन दुप्पट करा; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा मोठा विस्तार करून लसीकरण मोहिमेला गती द्या; नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा; आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे रक्षण करा.
या बैठकीस संबोधित करताना विद्या चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस), उल्का महाजन (सर्वहारा जन आंदोलन), तिस्ता सेटलवाड (सबरंग इंडिया), राजू कोरडे (शेतकरी कामगार पक्ष), मेराज सिद्दिकी (समाजवादी पक्ष), धनंजय शिंदे (आम आदमी पक्ष), प्रभाकर नारकर (जनता दल सेक्युलर), डॉ. एस. के. रेगे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), फिरोज मिठीबोरवाला (हम भारत के लोग), अनिल त्यागी (एसयुसीआय), किशोर ढमाले (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष), सुभाष काकुस्ते (लाल निशाण पक्ष), डॉ. विवेक मोंतेरो (सीटू), प्रा. तापती मुखोपाध्याय (एमफुक्टो), मिलिंद रानडे (एनटीयुआय), युवराज घटकळ (एनएपीएम), ब्रायन लोबो (कष्टकरी संघटना), प्राची हातिवलेकर (जनवादी महिला संघटना), निरंजनी शेट्टी (श्रमिक मुक्ती दल) आणि इतर अनेक नेत्यांनी भारत बंद ला संपूर्ण व सक्रिय पाठिंबा व्यक्त केला.

या संघटनांचे नेतृत्व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड याना भेटले आणि महाविकास आघाडीतर्फे दि. २७ सप्टेंबरच्या भारत बंद ला संपूर्ण व सक्रिय पाठिंबा देण्याचे त्यांना आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनाही प्रतिनिधीमंडळ लवकरच भेटणार आहे. या सर्व नेत्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला व तसे जाहीर निवेदन देण्याचे मान्य केले. महाराष्ट्रभर हा भारत बंद यशस्वी करण्याची तयारी सर्व जिल्ह्यांत सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यांत वरील सर्व पक्ष – संघटनांच्या बैठका होऊन नियोजन करण्यात आले आहे. खेड्यांत आणि शहरांतील वस्त्यांत हजारो सभा सुरू आहेत. लाखो पत्रकांचे वितरण झाले आहे. कालच्या बैठकीने या सर्व प्रक्रियेला येत्या दिवसांत जास्त गती देण्याचा निर्णय घेतला आहे व तसे नियोजन केले आहे. जन आंदोलनांची संघर्ष समिती, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, असंघटीत कामगार संघर्ष समिती, हम भारत के लोग, नेशन फॉर फार्मर्स यांच्या द्वारे भारत बंद करण्याबाबत जोरदार बुलंद हाक देण्यात आली आहे.