आपला जिल्हा

विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची समस्या सोडवा – आ. चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई / अमरावती. ( प्रतिनिधी ) – सिंचन प्रकल्पांनी बाधित झालेल्या लाखो प्रकल्पग्रस्तांचे न्याय प्रश्न घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने उपोषण पुकारले आहे. या समितीच्या सदस्यांना पुढील आठवड्यात मुंबईला चर्चेसाठी बोलविण्यात आले असून, जलदगतीने हा प्रश्न सोडविण्यात येईल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

या आंदोलनात विदर्भातील सुमारे ५०० कुटुंब उपोषणाला बसले आहेत. यात प्रकल्पग्रस्त महिलांचा सहभाग मोठा असून, आता प्रकल्पग्रस्तांच्या मुलांनीही शाळा सोडून आंदोलनात उडी घेतली. हे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असून, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून तोडगा काढला नसल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेच्या निदर्शनात आणून दिले. उपोषणात मुलांचाही सहभाग असल्याने हा चिंतेचा विषय ठरू शकतो. त्या आंदोलकांशी तात्काळ संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, संघर्ष समितीला चर्चेसाठी पुढील आठवड्यात मुंबईला बोलाविण्यात आले आहे. त्यांच्याशी चर्चा करून, तात्काळ यावर तोडगा काढू. उपोषणाचा आज आठवा दिवस असून सुमारे १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. दोन महिलांना इर्विनमध्ये रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने आंदोलकांसह शेतकरी संतप्त झाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे