आपला जिल्हा

वारकरी सेनेची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती. (प्रतिनिधी) – कोरोना दक्षता निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी 10 मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. विदर्भातील अन्य पालख्यांनाही मर्यादित संख्येत जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वारकरी सेनेने केली आहे. त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे सांगितले. वारकरी सेनेच्या पदाधिका-यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

विदर्भात 40 प्रमुख पालख्या आहेत. त्यांच्या प्रत्येकी किमान 10 वारक-यांना कोरोना दक्षता नियमांचे पालन करुन स्वतंत्र वाहनाद्वारे जाण्याची परवानगी मिळण्याची मागणी सेनेच्या पदाधिका-यांनी केली. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य मानून पालखी सोहळ्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. तथापि, सेनेच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आषाढी वारीसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांतील पालख्यांबाबत नियोजनासाठी दरवर्षी पालखी सोहळ्याच्या आधी विभागीय स्तरावर बैठक घेण्यात येईल, असा निर्णय यावेळी झाला.

याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, ह. भ. प. मनीष महाराज शेटे, ह. भ. प. अरुण महाराज बुरघाटे, ह.भ. प. श्याम महाराज निचित, ह. भ. प. मधुकर महाराज साबळे, ह. भ. प. बाळकृष्ण आमले आदी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे