आपला जिल्हा

दत्तोपंतांचे कार्य जगभरात पोहोचविण्याची आवश्यकता – दत्तात्रेय होसबाळे

ठाणे. ( प्रतिनिधी ) – दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या जीवनात राष्ट्र, समाज, समुदायाच्या उन्नतीचे मौलिक कार्य केले. संघटन कौशल्यासह ते विचारवंत, द्रष्टे होते. त्याची अनेक उदाहरणे देशातीलच नव्हे तर जगातील कार्यकर्त्यांना अवगत आहेत. त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांना राष्ट्रऋषी म्हटले जाते आणि ते सार्थक आहे. ठेंगडी यांनी ज्ञान, तपस्या, आराधना यांतून मनुष्य निर्माणासाठी प्रयत्न केले. त्यातून त्यांनी ऋषी आणि समाज ही दोन्ही ऋण फेडली. त्यांचे हे कार्य अधिकाधिक तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी आज केले.

होसबाळे पुढे म्हणाले की, एकूणच जनता आणि भूमी मिळून राष्ट्र निर्माण होते. या पुस्तकातून जीवन जगण्याची कला, आत्मा, अभिव्यक्ती या सर्वांचा परामर्श घेण्यात आला आहे. अध्यात्म हा राष्ट्राचा आत्मा असतो. जगातील अन्य देशांत विविधतेत एकता आहे, मात्र आपल्याकडे एकतेतून अनेकतेत जाता येते, ही आपली संस्कृती शिकवते. हा ग्रंथ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अधिकाधिक ग्रंथालय, महाविद्यालयांच्या माध्यमातून हा ग्रंथ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यातून मानवता, योग्य विचारांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. प्रा. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले की, दत्तोपंत ठेंगडी हे विद्वत्तेचे भांडार होते. त्यांच्या विद्वत्तेचा लाभ मिळालेल्या भाग्यवंतांपैकी मी एक आहे. या पुस्तकात राष्ट्र संकल्पना, संस्कृती आदी अनेक मुद्यांचा उल्लेख आहे. त्यासोबतच अर्थचिंतन हा महत्वाचा मुद्दा आहे. अन्य देशांत संघर्ष, भांडवलशाही या गोष्टी समोर आल्या, तर भारतात संघर्षाशिवाय समन्वय, कुटुंब व्यवस्था, जात-पात एकसमानतेचा धागा राहिला. पाश्चात्य देशांत एकात्मवाद, युद्धातून राष्ट्रवाद या गोष्टी समोर आल्या. तर भारतात संघर्षविरहित समाज, सर्वांना सामावून घेणे, राष्ट्र कल्पना हे पदर आहेत. एकात्म मानव दर्शन हा मूळ गाभा आहे. विषमता आणि समता यापेक्षाही समरसता असणे अधिक आवश्यक आहे. ग्रंथाचे संपादक प्राचार्य श्याम अत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, या ग्रंथात अनेक पुस्तकांचे एकत्रित संदर्भ समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये देशभरातील अनेक लेखकांनी लिखाण केले आहे, ग्रंथातील २५ टक्के भाग म्हणजे ९३ पाने राष्ट्र, राष्ट्र उभारणी, भारतीय चिंतन यांनी स्फुरीत आहे. साम्यवाद आणि भांडवलशाही यापुढे जाऊन तिसरा मार्ग किंवा पर्याय याचा उहापोह यात आहे. दत्तोपंतांनी सुमारे २५ संघटनांचे नेतृत्व केले त्यातील प्रातिनिधीक पाच संघटनांची माहिती यात देण्यात आली आहे. तसेच त्यांनी लिहिलेल्या ३५ पुस्तकांपैकी दोन पुस्तकांचा आढावा घेण्यात आला आहे. यातून त्यांची दूरदृष्टी, नेतृत्व, द्रष्टेपणा आदींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय २००४ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या श्रद्धांजलीपर भाषणाचा भाग यात समाविष्ट करण्यात आला आहे. हा ग्रंथ अभाविपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो महाविद्यालयात पोहोचवण्याची योजना आहे. यातून विद्यार्थ्यांना संघ विचार, त्याचे प्रचारक, चिंतन, मनन योग्य पद्धतीने पोहोचेल. सध्या ज्याप्रकारे वैश्विक वातावरण निर्माण होत आहे ते पाहता पुढील १००-१५० वर्षांसाठी प्रचारक आणि विचारक तयार करून वाटचाल करण्याची गरज आहे.

श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष मधुकर चक्रदेव यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर जोशी यांनी केले. भारतीय मजदूर संघ, ठाणे जिल्हा आणि श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दत्तोपंत ठेंगडी – द्रष्टा विचारवंत’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात होसबाळे प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ विचारवंत प्रा. अनिरुद्ध देशपांडे, भारतीय मजदूर संघाचे माजी अखिल भारतीय अध्यक्ष सी.के. सजीनारायण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विवेक मोडक, भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल दुमणे, पुस्तकाचे संपादक तथा श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समितीचे कार्यवाह प्राचार्य श्याम अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे