प्रभावी संवाद ही सुशासन आणि पारदर्शकतेची गुरुकिल्ली – उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू
# सरकारला लोकांच्या जवळ आणणे ही सार्वजनिक संवादकाची भूमिका
नवी दिल्ली. ( प्रतिनिधी ) – भारत सरकार उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज सुशासनामध्ये प्रभावी संवादाच्या भूमिकेवर भर दिला आणि स्थानिक भाषांमध्ये सरकारी धोरणे तसेच उपक्रम याबाबत लोकांना वेळोवेळी माहिती देऊन सक्षम बनवावे असे आवाहन त्यांनी सार्वजनिक संवादकांना केले. हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी आज 2020 च्या तुकडीच्या भारतीय माहिती सेवेच्या (IIS) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या गटाशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू म्हणाले की, सरकार आणि नागरिकांमधील अंतर कमी करण्यात सार्वजनिक संवादक महत्त्वाची भूमिका बजावतात. “तुम्ही लोकांना विविध योजनांची माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत दिली तर ते त्यांचे हक्क आणि सरकारी प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजून घेतील. यामुळे पारदर्शकता येते, ”असे त्यांनी प्रशिक्षणार्थींना सांगितले. खातरजमा करुनच माहिती देणे ही सरकारी संवादाची गुरुकिल्ली आहे असे उपराष्ट्रपती नायडू पुढे म्हणाले. माहिती सेवा अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांच्या विरोधात काम करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले. लैंगिक असमानता आणि काही लोकांमधील लसीकरणाबाबत असलेला संकोच दूर करणे यासारख्या सामाजिकदृष्ट्या संबंधित विषयांवर काम करण्यासही त्यांनी सांगितले. प्रसारमाध्यम एक शक्तिशाली साधन आहे इच्छित परिवर्तन घडवून आणण्यासाठी या साधनाचा जबाबदारीने वापर करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. “लोकांशी जोडून घ्या, संवाद साधा आणि परिवर्तन घडवा,” असे उपराष्ट्रपतींनी आपल्या खास शैलीत सांगितले. आयआयएस प्रशिक्षणार्थी अधिकारी हैदराबादमध्ये पत्र सूचना कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या इतर मीडिया युनिट्समध्ये त्यांच्या प्रशिक्षण संलग्नतेचा भाग म्हणून सहभागी झाले आहेत.नागरी सेवेत निवड झाल्याबद्दल या तरुण अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. योग्य माहिती देऊन लोकांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने माहिती सेवेची मोठी भूमिका आहे असे उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.