ई-पीक पाहणी उपक्रम यशस्वीपणे राबवा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
# अवैध रेती वाहतूक व चोरीस अटकाव करा.
वर्धा. ( प्रतिनिधी ) – ई पीक पाहणी ही महसूल विभागाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या खात्रीने या उपक्रमांतर्गत पिकांच्या नोंदी, जमिनी संबंधीच्या नोंदी नोंदविता येतात. त्यामुळे महसूल विभागाव्दारे ई पीक पाहणी मोहिम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत मंत्री थोरात यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती व महसूल विभागाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांना पीकांच्या नोंदी व इतर महत्वाच्या शेतीच्या नोंदी व्यवस्थित करता याव्यात, यासाठी शासनाने ई पीक पाहणी उपक्रम अंमलात आणला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वत: पीकांच्या नोंदी, पिकाचे क्षेत्रफळ, नुकसानीचे छायाचित्रे व त्याचे क्षेत्रफळ आदींची अचूक नोंद करता येते. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही या उपक्रमाला प्राधान्यक्रमाने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यास त्यांचे निराकरण करुन योग्य मार्गदर्शन करावे. यासाठी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यास बंधनकारक करण्यात यावे. संगणीकृत सातबारा वितरणाचे काम राज्याने हाती घेतले असून यापुढच्या काळात जमीनीचा पोत, फेरफार, पीकांच्या नुकसानीच्या नोंदी आदी कामे प्रत्यक्ष शेतकऱ्यासमक्ष केल्या जाणार आहे, यामुळे भविष्यात उद्भणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होणार आहे असेही थोरात म्हणाले. वर्धा जिल्यात वर्धा ही मोठी नदी वाहत असून अवैध रेती उपसा, अवैध वाहतूक, वाळू चोरी यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने जबाबदारीपूर्व काम करावे. रेती घाट लिलावाची प्रक्रिया लवकर होण्यासाठी सर्व बाबींची पूर्तता तातडीने करून घ्यावी, तसेच लिलाव अगदी पारदर्शकपणे करावेत. रेती तस्कारांवर कठोर कारवाई करुन प्रशासनाचा जरब बसवावा अशा सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी थोरात यांनी जिल्हा महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त पदांची सद्यस्थिती बाबत आढावा घेतला. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण चांगले असले तरी दुसरा डोज घेणाऱ्यांची संख्या पहिल्या डोजच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे प्रत्येक गावनिहाय लसीकरणाची आकडेवारी गोळा करुन लसीकरणाची मोहिम प्रभावीपणे राबवावी. केारोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, प्राणवायूचा साठा व प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प निर्मितीवर भर देण्यात यावा. प्राणवायूमुळे किंवा आरोग्य सुविधेच्या अभावी कोणाचाही मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान श्रीमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागाचा यावेळी आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, महिला व बालकांवर अत्याचार यावर तत्काळ कारवाईसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापित करण्यात यावी. कोविड आजाराने दोन्ही पालक दगावलेल्या बालकांचे सुरळीत संगोपनासाठी जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. अशा बालकांना दत्तक देताना त्यांना शासनाव्दारे सानुग्रह निधी मिळवून द्यावा. जिल्ह्यात बालविवाह, बालकामगार, महिला व बाल अत्याचाराच्या घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनासह महिला व बालकल्याण व पोलीस विभागाने तत्काळ कार्यवाही करावी. जिल्ह्यात उत्कृष्ट रचनेचे महिला व बालकल्याण भवन निर्मितीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच प्रस्तावाचा नियोजन आराखडा व निधी मागणीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत शासकीय यंत्रणांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थिती आणि उपलब्ध आरोग्य सुविधा आणि महसूल विभागाचे सादरीकरण केले.
याप्रसंगी बैठकीला महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अप्पर जिल्हाधिकारी मनोज खैरनार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह महसूल यंत्रणेचे अन्य अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
# निर्माणाधिन जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी निर्माणाधिन जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली. या ग्रीन इमारतीच्या निर्मितीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार रणजित कांबळे आणि जिल्हाधिकारी उपस्थित होत्या.