आपला जिल्हा

बत्ती गुल होण्या आधी वीज बिल भरा.

# तीन आठवड्यात 42 हजार थकाबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित, आणखी 2 लाख ग्राहक रडारवर

कल्याण. ( प्रतिनिधी ) – कल्याण परिमंडलात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास 42 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांकडून विजबिलाची वसुली अथवा त्यांच्या वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 500 रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे 2 लाख 1 हजार 32 वीज ग्राहक रडारवर असून त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे. गेल्या तीन आठवड्यात कल्याण मंडल एक (कल्याण व डोंबिवली) अंतर्गत 5 हजार 465, कल्याण दोन मंडल दोन (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत 7 हजार 972, वसई मंडल (वसई व विरार) अंतर्गत 13 हजार 214 आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत 15 हजार 250 ग्राहकांचा तसेच 25 पाणीपुरवठा योजना व 149 पथदिवे जोडणीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यातील 20 हजार 211 ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनरजोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. तर सप्टेंबर महिन्यापूर्वी 1 लाख 65 हजार थकाबाकीदारांचा शिवाय 311 पाणीपुरवठा योजना व 786 पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील 6 लाख 72 हजार ग्राहकांकडे 669 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून महावितरणला संकटाच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे.

# विजेचा अनधिकृत वापर टाळा.
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिल व थकबाकी तसेच पुनरजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या ग्राहकांनी शेजारून अथवा परस्पर जोडणी किंवा अन्य माध्यमातून विजेचा अनधिकृत वापर केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. याची परिमंडलातील सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे